वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील
सचिन तोडकर, पुणे स्टार न्यूज नेटवर्क
कासारी ता.११: वाहतूक कोंडी झाली कि मला जबाबदार धरायची राष्ट्रवादीच्या नेत्यांना सवय जडली आहे. पण मला त्यांना सांगायचे आहे कि वाहतूक कोंडी हे तुमचेच पाप आहे, ते माझ्या माथी मारू नका. तुम्ही सत्तेत असताना मी वेळोवेळी मंत्रालायाचे उंबरटे झिजवून तुमच्याकडे कामाचा पाठपुरावा केला होता. पण वाहतूक कोंडी, लोकांची सोय, विकास यापेक्षा तुम्हाला टक्केवारी महत्वाची वाटत होती, म्हणूनच तुम्ही माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले. कुठल्याच प्रकल्पासाठी एक दमडाही दिला नाही. राज्यात पंधरा वर्ष तुम्ही सत्तेत असताना ही ठेकेदार कुणाचा द्यायचा यावरून राष्ट्रवादीच्या दोन वजनदार नेत्यांच्या भांडणात तळेगाव - चाकण - शिक्रापूर - न्हावरा - चौफुला जंक्शन रस्ता आणि पुणे -नगर रस्ता या दोन राज्यमार्गांची कामे रखडली. त्यामुळेच आज रस्त्यावर वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्याला सर्वस्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व त्या पक्षाचे नेतेच जबाबदार आहेत असा आरोप खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.
शिरूर तालुक्यातील पिंपळे-जगताप, कोरेगाव-भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, लांडेवस्ती, कासारी, निमगाव म्हाळुंगी, शिरूर शहर, सरदवाडी, कोंढापुरी, राऊतवाडी आदी गावांचा निवडणूक प्रचार दौरा आज खासदार आढळराव पाटील यांनी केला, त्यावेळी झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख शिवाजीराव कुऱ्हाडे, रयतक्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब फराटे, कैलास पाटील, घोडगंगाचे माजी संचालक कैलास सोनावणे, बापुसाहेब शिंदे, मच्छिंद्र गदादे, आदी सहभागी होते. गावागातील ग्रामस्थांनी खासदार आढळराव पाटील यांचे ढोलताश्यांच्या गजरात स्वागत केले, तर महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना खा.आढळराव पाटील म्हणाले "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर देशात खर्या अर्र्थाने विकास सुरु झाला. पुणे - नगर रस्ता, तळेगाव - चाकण - शिक्रापूर - न्हावरा - चौफुला जंक्शन रस्ता, अष्टविनायक मार्ग, आदिवासी भागातून जाणारा किल्ले शिवनेरी, अष्टविनायक गणपती व भीमाशंकर आदी धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणांना जोडणारा बनकर फाटा ( जुन्नर ) ते भीमाशंकर, ताळेघर मार्गे राजगुरुनगर रस्ता तसेच नाशिक फाटा ते चांडोली रस्ता सहापदरीकरण, राजगुरुनगर ते सिन्नर रस्ता चौपदरीकरण, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे यासारखे मोठे प्रकल्प मंजूर झाले. आपल्या खासदारकीच्या मागील साडेचार वर्षाच्या काळात मी जवळपास चौदा हजार कोटींची विकास कामे मंजूर केली. मी केलेली विकासकामे विरोधकांना दिसत नसली तरी ती या मतदार संघातील मायबाप जनतेला ठाऊक आहेत."